इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून



इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ – शिक्षकाच्या नजरेतून

इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ हा प्रत्येक शिक्षकासाठी भावनांनी भरलेला क्षण असतो. वर्षानुवर्षे ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवत असतो, त्यांना निरोप देण्याची वेळ आली की, मनात आनंद, अभिमान आणि थोडीशी हुरहूर अशा मिश्र भावना दाटून येतात.

शिक्षकाच्या दृष्टीने हे विद्यार्थी फक्त ‘विद्यार्थी’ नसतात, तर ते आपल्या कुटुंबाचा एक भाग बनलेले असतात. त्यांच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. कधी खोडकर, कधी अभ्यासात रममाण, तर कधी निराश झालेल्या या मुलांना योग्य मार्गदर्शन देताना शिक्षकांचाही प्रवास समृद्ध होत जातो.

निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. नवीन कपडे, नवीन चष्मा,... मस्त टकाटक तयार. काहीजण उत्साहात असतात, तर काहींच्या डोळ्यांत अश्रू दाटलेले असतात. शिक्षक म्हणून त्या प्रत्येक भावनेशी आपण जोडलेले असतो. त्यांच्या यशात आपला वाटा असल्याचा अभिमान वाटतो, पण त्यांच्याशिवाय वर्ग रिकामा वाटेल ही जाणीवही मनाला स्पर्श करून जाते.

या प्रसंगी एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना काही मोलाचे संदेश द्यावेसे वाटतात. प्रामाणिकपणा, मेहनत आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर जीवनात मोठ्ठं यश मिळवता येतं. गुणपत्रिका ही फक्त एक टप्पा आहे, पण खरे शिक्षण म्हणजे जीवनातील मूल्ये आणि अनुभव.

शेवटी, निरोप देताना एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना एकच आशीर्वाद द्यावासा वाटतो. “तुमचा पुढचा प्रवास उज्ज्वल होवो, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या शाळेचे, शिक्षकांचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करा.” हा निरोप म्हणजे शेवट नसून एका नवीन सुरुवातीची नांदी असते.

इयत्ता 10 वीचा निरोप समारंभ हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याची गोड आठवण बनून कायम मनात राहतो. रोज चिवचिव करणारी पाखरे अचानक नजरेसमोरून गायब होणार. पहिल्यासारखी दररोज न दिसता, भेटता... कधीतरी दिसणार, भेटणार. ही भावनाच मन व्याकुळ करून जात असते. मुळात वाटत नसला तरी, शिक्षक हा खुप भावनिक प्राणी... फक्त त्याला सर्वच भावना काही दाखवता येत नसतात. कधी काही सामाजिक, तर कधी काही व्यावसायिक बंधने असतात. 

तसं पाहता, आजचा दिवस खूप special असतो. मुलांना आज अचानकपणे आपण मोठे झाल्याची जाणीव होते. मुले जबाबदार होत असतात. परीक्षेच्या बाबतीत सिरीयस होत असतात. अभ्यासाला लागतात... यापुढे चार भिंतींच्या शाळेतल्या असंख्य आठवणी मनाच्या पटलावर आयुष्यभर रेंगाळत राहणार असतात...

एकत्र खाल्लेला डबा असो... एकत्र केलेली दंगा मस्ती असो... सारं काही मनाच्या कोपऱ्यात आठवणींच्या स्वरूपात रेंगाळत राहतं.

" कल का फ्युचर आज लिखते है ! 
मेहनत से अपनी पेहचान लिखते है ! 
Students कभी रुकते नहीं, 
वो अपनी किस्मत खुद लिखते है !"

सागर पुंडलिक इप्ते, वरळी.
शिल्पकार क्लासेस 
(92242 41184)

Comments

Popular posts from this blog

हिम्मत लागते...